अमरावती :महामानवडॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या काही अस्थी या अमरावती जिल्ह्यात नया अकोला या गावात (Dr Babasaheb Ambedkar ashes) आहेत. या ठिकाणी असणाऱ्या ह्या अस्थींच्या दर्शनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेकडो अनुयायी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला 9 डिसेंबरला अस्थि स्थापना दिनाच्या पर्वावरदेखील मोठ्या संख्येने येतात.
बाबासाहेबांच्या अस्थी :नया अकोला ह्या छोट्याशा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि असणे ही खरंतर आश्चर्याची बाब आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत निधन झाल्यावर त्यांच्या मृतदेहावर दादर येथील चौपाटीलगत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. असे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थि इतक्या लांब नया अकोला येथे कशा आल्या याबाबत अतिशय रोचक असा प्रसंग आहे. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले त्या दिवशी अमरावती शहरात अनेक टांग्यांवर भोंगे लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाची माहिती नागरिकांना देण्यात आली.
अंत्ययात्रेत सहभागी :त्यावेळी अमरावती शहरातील अकॅडमिक हायस्कूल येथे इयत्ता दहावीत शिकणारा पिरकाजी खोब्रागडे या विद्यार्थ्याने शाळेजवळ आलेल्या टांग्यावरील भोंग्यात आवाज ऐकला आणि तो थेट शहरातील सायन्सस्कोर या शाळेत त्यावेळी इयत्ता नववीत शिकणारा धोंडोजी छापामोहन याच्याकडे आला. बाबासाहेब गेलेत त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी मुंबईला जाऊ, असे पिरकाची यांनी धोंडोजींना सांगितले. त्यानंतर ते दोघेही बडनेरा रेल्वे स्थानकापर्यंत पायी चालत गेले. त्यावेळी बडनेरा रेल्वे स्थानकावर मुंबईला जाण्यासाठी एक बोगी आधीच उभी राहायची. त्या भोगीत हे दोघेही चढले. तासाभराने नागपूर वरून आलेल्या गाडीला हा डबा जोडण्यात आला आणि ही गाडी थेट मुंबईला निघाली. मधातल्या स्थानकांवर या डब्यात प्रचंड गर्दी झाली. गाडी मुंबईला पोहोचल्यावर पिरकाजी आणि धोंडोजी दोघेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यानंतर या दोघांनी दादर चौपाटीलगतच रात्री कडाक्याच्या थंडीत मुक्काम केला. पहाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत आणि इतर नातेवाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी घेण्यासाठी आले असताना पिरकाची आणि धोंडोजी हे दोघेही अस्थी सावटणाऱ्यांसोबत सहभागी झालेत. यावेळी दोघांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही अस्थी उचलल्या आणि खिशात ठेवल्या. हे दोघेही 9 डिसेंबरला अमरावतीत (Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana day) पोहोचले.
अनुयायी अस्थींच्या दर्शनासाठी :पिरकाजी आपल्या शाळेतील वस्तीगृहात न जाता थेट आपल्या नया अकोला ह्या गावी गेले आणि त्यांनी आईला सोबत आणलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी दाखवल्या. त्यांच्या आईने बाबासाहेब केवळ आपलेच नव्हते तर गावातील प्रत्येकाचे होते, असे म्हणत या अस्थी गावातील चौकात ठेवायला सांगितल्या. गावातील ग्रामस्थांनी याबाबत एक बैठक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अस्थी मोठ्या आदराने जमिनीत एका ठिकाणी पुरवल्या आणि त्यावर छोटासा ओटा बांधून त्यांचे जतन करून ठेवले. तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असणाऱ्या नया अकोला या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी अस्थींच्या दर्शनासाठी येतात. ही संपूर्ण कहाणी सध्या हयात नसणारे पिरकाची खोब्रागडे यांच्या पत्नी शांताबाई खोब्रागडे यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना सांगितली. पिरकाची खोब्रागडे यांच्यासोबत लहानपणी मुंबईला गेलेले धोंडोजी छापामोहन यांनी मुंबईला जाण्याचा प्रसंग सांगत माझ्या खिशात आणलेल्या अस्थी मी पिरकाजी खोब्रागडे यांना त्यावेळी दिल्या होत्या. त्या अस्थी आज देखील नया अकोला ह्या गावात आहेत असे धोंडोजी छापामोहन 'ईटीव्ही भारत'शी बोलताना (Babasaheb Ambedkar ashes located at Naya Akola) म्हणाले.