अमरावती -अमरावती विभागाचे आरोग्य उपसंचालक पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहे. या पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. यामुळे अमरावती आरोग्य विभाग वाऱ्यावर आहे, अशी टीका आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
कर्मचारी नातेवाईंकाना दाद देत नाहीयेत -
राज्य सरकारकडून कोरोना काळामध्ये अमरावती विभाग आरोग्य विभागाकडे दुर्लक्षित झाले आहे. अमरावती विभागातील आरोग्य उपसंचालक पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहे. अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांना या पदावर प्रभारी पदभार देण्यात आला आहे. त्याशिवाय कोरोना काळातही ते स्वतःचे रुग्णालय चालवतात. आज कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाला आहे. ग्रामीण भागात गोरगरिबांना शासकीय रुग्णालय, कोविड सेंटर हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, दुर्दैवाने शासकीय रुग्णालयाची विशेषतः ग्रामीण भागातील केंद्रावर भीषण परिस्थिती आहे. पुसदमधील कोरोना केंद्रावर स्वच्छता, पाणी, ऑक्सिजन या सर्व गोष्टी उपलब्ध नाही. उपचारावर कोणाचे नियंत्रण नाही. नातेवाईकांना आतमध्ये जाता येत नसल्यामुळे सर्व जबाबदारी कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, कर्मचारी नातेवाईकांना दाद देत नाही, असा आरोप डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.