अमरावती:आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निघून जाणे मनाला चटका लावणारे असते. त्या दुःखातून बराच काळ आपण निघत नाही. एखाद्या जिवलगाचे अचानकपणे निघून जाणे दुःखदायक असते. ज्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचे निधन झाल्यानंतर पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमा निमित्ताने तेरवी आयोजित करण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे अमरावतीतील वसंतराव ठाकरे यांच्या परिवारानेसुद्धा बिट्टू नामक कुत्र्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर त्या कुत्र्याची परंपरेनुसार तेरवी केली.
बिट्टू नावाच्या कुत्र्याचे पुण्यस्मरण: ठाकरे कुटुंबीयांनी जपलेल्या अजब जिव्हाळ्याची गावात चर्चा होताना दिसत आहे. बिट्टू हा केवळ ठाकरे परिवारातच नव्हे तर संपूर्ण गावातसुद्धा सर्वांचा लाडका होता. घरात आणि गावातसुद्धा त्याचे वागणे वावरणे हे एका मनुष्य मात्रापेक्षा कमी नव्हते. ठाकरे कुटुंबातील तो एक सदस्यच होता. त्याचे निघून जाणे हे ठाकरे परिवाराला दुःख देऊन गेले. त्यामुळे घरातील सदस्याप्रमाणेच पाळीव कुत्रा बिट्टूचीसुद्धा तेरवी करण्याचे ठाकरे परिवाराने ठरवले. बिट्टूच्या थळग्यावर वसंतराव ठाकरे दररोज भोज घेऊन जायचे. काल रविवारी 22 जानेवारीला ठाकरे परिवाराच्या घरी तेरवीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये गावातील मंडळी तसेच जवळील नातलग येऊन त्यांनी बिट्टूचे पुण्यस्मरण केले.
ठाकरे कुटुंबीयांचे डोळे पाणावले :या कार्यक्रमाच्या वेळी बिट्टूच्या आठवणीमुळे ठाकरे कुटुंबीयांचे डोळेसुद्धा पानावले होते. सर्वच चर्चा होत असली तरी कुत्रा हा एक प्रामाणिक असा पाळीव प्राणी आहे. आपल्यावर त्याचे जीवन अवलंबून असल्याने त्याला हळहळ न करता त्यावर दया दाखवण्याचा संदेश ठाकरे परिवाराने या माध्यमातून दिला आहे.