अमरावती Matoshree Vrudhashram Amravati :आपला लाडाकोडात वाढवलेला मुलगा किंवा मुलगी यांना पालकांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्यांचं लग्नही लावून दिलं. मात्र मुलांना आई-वडील हे त्यांच्या सुखी संसारात अडथळा वाटायला लागल्यावर त्यांनी आई-वडिलांना थेट वृद्धाश्रमाची वाट दाखवली. अमरावती शहरालगत असणाऱ्या मालखेडच्या जंगल परिसरातील 'मातोश्री' वृद्धाश्रमात कुणी तीन वर्षांपासून राहायला आलं आहे. तर कोणी 25 वर्षांपासून वृद्धाश्रमातच आपलं छोटसं जग निर्माण करून राहतंय. खरंतर आयुष्याची संध्याकाळ स्वजनांसोबत आनंदात घालवण्याचं स्वप्न उद्धवस्त झालं. वृद्धाश्रमातच अनेक वृद्ध मंडळी आनंद शोधण्याचा प्रयत्न करताय. 'मातोश्री' वृद्धाश्रमात आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करणाऱ्या एकूण 57 वृद्धांची दिवाळी परक्यांच्या मदतीनंच आनंदमय करण्याचा प्रयत्न केला जातोय.
28 वर्षांपासून 'मातोश्री' वृद्धाश्रम देत आहेत वृद्धांना आधार :अमरावती शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर मालखेड जंगल परिसरात 1998 मध्ये सुखदेवराव राऊत यांनी 'मातोश्री' वृद्धाश्रम सुरू केलं. त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार होतं. राज्य शासनाच्या वतीनं वृद्धाश्रमासाठी 'मातोश्री' योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत केवळ पहिल्या वर्षी या वृद्धाश्रमासाठी अनुदान मिळालं. मात्र त्यानंतर सुखदेवराव राऊत यांनी आतापर्यंत स्वखर्चानंच हे वृद्धाश्रम चालवलंय. या वृद्धाश्रमात सध्या एकूण 57 वृद्ध आश्रयाला आहेत. यापैकी काही जणांना आता कुणाचाही आधार नाही. तर अनेकांना मुलं असतानादेखील आधार नसल्यामुळं त्यांना 'मातोश्री' वृद्धाश्रमाच्या माध्यमानं आपलं हक्काचं घर मिळालंय.
विविध सामाजिक संस्थांच्या मदतीनं होते दिवाळी साजरी : 'मातोश्री' वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त वृद्धाश्रम प्रशासनाच्या वतीनं लाडू चिवडा शंकरपाळे असे फराळाचे सर्व पदार्थ तयार केले जातात. विशेष म्हणजे वृद्ध महिला या स्वतः फराळ तयार करण्यात मदतदेखील करतात. यासोबतच अमरावती शहर आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी खास दिवाळीचा उत्सव आयोजित करतात. दिवाळीनिमित्त 13 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत विविध समाजसेवी संघटनांच्या वतीनं भोजन दिले जाणार आहे. सर्व वृद्धांना नवीन कपडेदेखील दिले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमाचं नियोजन पूर्ण झालं असल्याची माहिती वृद्धाश्रमात पहिल्या दिवसापासून कार्यवाहक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या शोभा उगले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.