अमरावती- शहरापासून 20 किमी अंतरावर फटाक्यांच्या जुन्या गोदामालगत उभारण्यात आलेल्या एडिफाय या शाळेला बांधकाम परवानगी कशी काय मिळाली याची जिल्हा प्रशासन चौकशी करणार आहे. याबाबत शुक्रवारी युवासेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दोन दिवसात शाळा आणि शाळा परिसराची पाहणी करू, असे आश्वासन युवासेनेला दिले.
एडीफाय शाळेला मिळालेल्या परवानगीची चौकशी जिल्हा प्रशासन करणार!
शाळेची इमारत सुरक्षित स्थळी असावी अशी नियमावली असताना फटाक्यांच्या गोदामजवळ एडिफाय शाळेला परवानगी कशी देण्यात आली याची चौकशी करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
शहराबाहेर कठोर गावासमोर 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून फटाक्यांचे गोदाम आहे. या गोदामजवळ तीन वर्षांपूर्वी एडिफाय शाळेची भलीमोठी इमारत उभारण्यात आली. शाळेची इमारत सुरक्षित स्थळी असावी, अशी नियमावली असताना फटाक्यांच्या गोदामजवळ शाळेला परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल माटोडे यांनी उपस्थित केला आहे.
शुक्रवारी राहुल माटोडे युवासेनेच्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करण्यासाठी आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल आढावा बैठकीत असल्याने युवासेनेने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांना या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले. डॉ. व्यवहारे यांनी शाळा चुकीच्या ठिकाणी असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याबाबत शिक्षण विभागाने 15 दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे. दोन दिवसात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांसह या शाळेची तपासणी आणि पाहणी केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी राहुल माटोडे यांचासह शैलेश चव्हाण, कार्तिक गजभिये, पावन लोंडे, मनोज करडे, नरेश नावंदर, सुधीर ढोके, ललित ठाकूर यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.