अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. सलग दोन वेळा या मतदारसंघात निवडून आलेले डॉ. रणजीत पाटील यांचा धीरज लिंगाडे यांनी 3382 मतांनी पराभव केला. दुसऱ्या पसंती क्रमांकच्या मतमोजणीनंतर धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 मते पडली तर डॉ. रणजीत पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली. धीरज लंगडे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा मात्र अद्याप प्रशासनाने केली नाही.
पहिल्या फेरीपासूनच लिंगाडे आघाडीवर : आज सकाळी 8 वाजेपासून अमरावती शहरातील नेमानी गोडाऊन येथे मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण एक लाख 2587 मतांपैकी 8735 मतही अवैध निघाली तर 93825 मते ही वैध ठरली. पहिल्या फेरीतच धीरज लिंगाडे यांनी 877 मतांची आघाडी घेतली होती. यानंतर सलग चारही फेरीमध्ये धीरज लिंगाडे यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीनंतर धीरज लिंगाडे यांना 43 हजार 340 मते मिळाली तर डॉ. रणजीत पाटील यांना 41 हजार 27 मते मिळाली.
रणजीत पाटालांचा अवैध मतांवर आक्षेप :पहिल्या पसंती क्रमाच्या फेरीत एकूण एक लाख 2587 मतांपैकी आठ हजार 735 मते अवैध ठरली. भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील या अवैध मतांवर आक्षेप घेतला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि अमरावती विभागाचे आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी अवैध मतांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. रात्री 1 वाजताच्या सुमारास अवैध मतांची पडताळणी झाल्यावर यामध्ये धीरज लिंगाडे यांना 33 मतांचा फायदा झाला.
दुसऱ्या पसंतीसाठी रात्री दोन वाजता मतमोजणी : पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीनंतर आणि डॉ. रणजीत पाटील यांनी अवैध मतांवर घेतलेल्या आक्षेपानंतर या अवैध मतांची पडताळणी झाल्यावर 46 हजार 927 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. रात्री 2 वाजतानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या पसंतीत क्रमात सर्वात कमी बारामती मिळालेल्या निलेश पवार यांना मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांच्या मोजणी पासून सुरुवात झाली. या बाद फेरीत एकूण 23 उमेदवारांपैकी 21 उमेदवार बाद होईपर्यंत मतमोजणीला प्रारंभ झाला.
रणजीत पाटीलांच्या विरोधात घोषणाबाजी : मतमोजणी दरम्यान अवैध ठरलेल्या 8735 मतांवर आक्षेप घेण्यासाठी डॉ. रणजीत पाटील हे रात्री 11 वाजताच्या सुमारास मतमोजणी केंद्रावर पोहोचले असताना मतमोजणी केंद्राबाहेर हजर असणारे जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. रणजीत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.