अमरावती -संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान शेंडगावबरोबरच त्यांची कर्मभूमी ऋणमोचन, नागरवाडी, वलगाव येथेही संयुक्त आराखड्यातून विकासकामे पूर्ण केले जातील. याकरिता निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज शेंडगाव येथे दिली. संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगाव या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन करताना त्या बोलत होत्या.
10 महिन्यात पूर्ण होणार कामे -
विकास आराखड्यात १८.६३ कोटी निधीतून धर्मशाळा बांधकाम, संत गाडगेबाबा स्मृती भवन, बहुउद्देशीय सभागृह, न्याहारी भवन, आर्ट गॅलरी, ग्राम सफाई अभियान प्रशिक्षण केंद्र, विद्युतीकरण, सिमेंट रस्ते, घाटाचे बांधकाम, प्रसाधनगृह आदी कामे ही १० महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले.