अमरावती -पीएम आवास घरकुल योजनेतील निधीसाठी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेवर आजपासून "डेरा आंदोलन" करण्यात येणार आहे. असा निर्णय लाभार्थ्यांसमवेतच्या बैठकीत आम आदमी पार्टीतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता घरकुलचा मुद्दा पेटणार असल्याचे चित्र आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळी व माजी न.प. सभापती मेहमुद हुसेन हे करणार आहे.
पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी आम आदमी पार्टीकडून नगर परिषदेवर "ताला ठोको" करण्यात आले होते व आंदोलनादरम्यान आश्वासन दिल्यानंतर काही दिवसांतच दुसऱ्या टप्प्यातील निधी लाभार्थ्यांना मिळाला होता. तर आता तिसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी लाभार्थ्यांना न. प. च्या चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मागणीनुसार तिसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी आम आदमी पार्टीने निवेदन देऊन १४ जुनपर्यंत अल्टीमेटम दिला होता. तत्काळ निधी न मिळाल्यास १५ जुन ला आंदोलनाचा इशारा आप नेते नितीन गवळी व मेहमुद हुसेन यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांना निवेदनातून दिला होता. तसेच नव्याने मंजुर झालेल्या ४०५ घरकुल लाभार्थ्यांनाही पहिला टप्पा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, तरीही स्थानिक प्रशासनाकडून ठोस पाऊले न उलचल्याने आम आदमी पार्टीकडून नितीन गवळी, मेहमुद हुसेन, गजानन गुल्हाणे, दत्ता नेमाडे यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांसमवेत छोटेखानी बैठक शहरातील महादेवघाट परिसरात आयोजित केली होती व चर्चा केली. या बैठकीतून आंदोलन करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून मंगळवारी "डेरा आंदोलन" न. प. मध्ये करण्यात येणार असल्याचे आम आदमी पार्टीकडून सांगण्यात आले आहे.