वरिष्ठांवर आरोप करत वनअधिकारी दिपाली चव्हाणांची आत्महत्या, स्वतःवर झाडली गोळी
वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार हेच दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्त्येस जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमरावती -मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या हरिसल वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह संपुर्ण जिल्हा हादरला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. मृत्यूपूर्वी दिपाली चव्हाण यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या चार पानांच्या पत्राद्वारे वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार हेच दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्त्येस जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असे आहे प्रकरण -
मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण या 2014 ला एमपीएससी मार्फत वन विभागात रुझु झाल्या. त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून धुळघट रेल्वे येथे पहिली पोस्ट मिळाली होती. 2019 मध्ये त्यांची हरीसालला बदली झाली. दरम्यान हरिसाल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र, त्यांच्याकडे वनपाल, वनमजुर असा पुरेसा स्टाफ नसताना त्यांनी मांगीय गावचे पुनर्वसन केले. यादरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी याबाबत विनोद शिवकुमार यांना माहिती दिली. मात्र तू खोटी बोलते, असे म्हणत त्यांनी दिपाली यांची मदत केली नाही. आदीवासी बांधवांच्या तक्रारीवरून दिपाली चव्हाण यांच्यावर अट्रोसिटी दाखल झाली असता 'असेच पाहिजे जा कारागृहात' असे शिवकुमार यांनी म्हटले होते. यासह शिवकुमार हे रात्रीला गस्ती दरम्यान कुठेही बोलवून असभ्य बोलायचे. कॅम्पवर बोलवायचे, अकोट फाट्यावर बोलवायचे. माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न शिवकुमार करीत होते. त्यांच्या मर्जीने वागले नसल्याने ते हरीसालला आल्यावर कर्माचाऱ्यांसमोर अपमानित करायचे. शिवकुमार यांच्या मर्जीने वागत नसल्याने माझे वेतन रोखण्यात आले, मानसिक छळ केला जात होता. गर्भवती असताना त्यांनी मला अमरावतीला सासरी जाऊ देण्याची परवानगीही फेटाळून लावली होती, असेही चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.
खासदार नवनीत राणांकडेही केली होती तक्रार -
गर्भवती असतानाही विनोद शिवकुमार यांनी जबरदस्तीने पहाडाववर गस्तीला पाठवले. यामुळे माझा गर्भपात झाला. या दुःखासह शिवकुमार यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल मी खासदार नवनीत राणा यांच्याकडेसुद्धा तक्रार केली होती, असे दिपाली चव्हाण यांनी पत्रात लिहिले आहे.
'सर, तुमचाच त्यांच्या डोक्यावर हात' -
सर सगळ्यांना माहिती आहे की तुमचाच विनोद शिवकुमार यांच्या डोक्यावर हात आहे. मी इतकं लिहून सुद्धा तुम्ही त्याचे काही बिघडवू शकणार नाही, असे दिपाली चव्हाण यांनी अपर प्रधान मुख्य संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना पत्राद्वारे म्हटले आहे.
शिवकुमार विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल -
हरिसलच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी उपवसंरक्षक विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात नमूद केल्याने धारणी पोलिसांनी शिवकुमार विरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
'ही अखेरची भेट, हे अखेरचे बोलणे' -
हरिसालच्या वन परीक्षेत अधिकारी दिपाली चव्हाण यांच्याकडे राहत असलेल्या त्यांच्या आई गुरुवारी जळगावला गेल्या होत्या. त्या सायंकाळी परत येत असताना खामगाव जवळ त्यांना दिपाली चव्हाण यांचा फोन आला. 'आई मी आता शेवटचं बोलते आहे', असे म्हणून दिपाली चव्हाण यांनी फोन ठेवला. यामुले त्यांच्या आई घाबरल्या आणि त्यांनी हरिसल येथील वन विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांना कळाले. दरम्यान दिपाली यांनी त्यांचे चिखलदरा कोषागारात कार्यरत पतिलाही कॉल करून हे अखेरचा बोलणं आल्याचं सांगितलं. कार्यालयातून निवास स्थानाकडे निगताना ही आपली अखेरची भेट असे दिपाली चव्हाण कर्मचाऱ्यांना म्हणाल्या.
कर्मचाऱ्यांनी तोडले चव्हाण यांच्या घराचे दार -
ही अखेरची भेट असे म्हणून कार्यालयातून घरी गेलेल्या दिपाली चव्हाण यांच्या बोलण्या वागण्याबाबत कर्मचाऱ्याना संशय आला. त्यांनी कार्यालयासमोरच असणारे चव्हाण यांचे निवासस्थान गाठले. घराचे दार बंद असल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेरून आवाज दिला. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता, दिपाली चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.