अमरावती :महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यावर पाच वर्ष राज्यातील सर्वच वर्गाचा आणि सर्वच क्षेत्राचा विकास व्हायला लागला. मागच्या अडीच वर्षात मात्र राज्यात महाविकास आघाडीचे जे सरकार होते, ते केवळ फेसबुकवर लाईव्ह होते आणि जनतेमध्ये डेड होते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर अमरावती येथे केली. अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी डॉक्टर रणजीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित संवाद सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील दसरा मैदान येथे उपस्थितांना संबोधित केले.
डॉक्टर रणजीत पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर :अमरावती पदवीधर मतदार संघात सलग दोन वेळा विजयी झालेले भाजपचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केला नाही. उमेदवारी घेण्यासाठी देखील काँग्रेसमध्ये कोणी धाडस करायला तयार नाही, अशा परिस्थितीत डॉक्टर रणजीत पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत आयोजित समाज सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, खासदार प्रताप जाधव यांच्यासह बडनेरा चे आमदार रवी राणा, जळगाव जामोद चे आमदार संजय कुठे, अकोल्याचे आमदार रणजीत सावरकर, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, वाशिमचे आमदार संजय पाटणी, निवडणूक प्रमुख चैनसुख संचेती प्रामुख्याने उपस्थित होते.
आम्हाला हवं, जनतेचे भलं :सत्ता ही केवळ समाजाच्या विकासासाठी आम्हाला हवी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ भ्रष्टाचाराच्या माध्यमातून स्वतःचेच भले केले आहे. आम्हाला मात्र जनतेचं भलं हवं, असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात पाच हजार शासकीय नोकऱ्या जाहीर केल्या. या नोकऱ्यांमध्ये त्या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केले. आम्ही मात्र पदवीधरांचा विचार करून पन्नास हजार शासकीय जागा काढल्या आहेत. या सर्व जागा पारदर्शक पद्धतीने भरल्या जाणार असून; कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.