अमरावती - मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या अमरावती जिल्ह्यात आता डेंग्यूने डोकेवर काढले आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने कमी झाले असताना आता शासकीय आणि खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांची गर्दी वाढली आहे. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढायला लागले असताना डेंग्यूसह पावसाळ्यातील साथ रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत असून अमरावती शहारत सर्वत्र फवारणी केली जात आहे.
डेंग्यू रुग्णांची संख्या हजाराच्यावर -
अमरावती शहरातील अनेक खासगी रुग्णालयात तसेच डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण दाखल आहेत. अमरावती शहरासह तिवसा, भातकुली, अचलपूर, धारणी या तालुक्यातही डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून तेथील ग्रामीण रुग्णालयातही मोठ्या संख्येत डेंग्यू रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्यात सध्या हजाराच्यावर डेंग्यू रुग्ण आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
डेंग्यू अळ्या आढल्यास कारवाई -
पावसाला उशिरा सुरुवात झाली असताना उकाड्यामुळे अनेकांनी कुलर जुलै महिना लागला असतानाही सुरूच ठेवले आहे. अनेकजण कुलरमधले पाणी साफ करत नसल्याने, साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या होतात. तसेच घरावर ठेवलेले दुचाकी वाहनांचे तसेच सायकलच्या टायरमध्ये पाणी साचल्याने त्यात डेंग्यूच्या अळया होतात. ज्या व्यक्तीचा घरात किंवा घराच्या परिसरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या तर त्या व्यक्तीवर दंडांत्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.