अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नामित सदस्य असणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांची हकालपट्टी करण्याची मागणी ४ जूनमध्ये झालेल्या सिनेटच्या बैठकीत करण्यात आली होती. असे असतानाही यावर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. याबाबत बुधवारी झालेल्या बैठकीत कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना जाब विचारण्यात आला. तसेच राज्यपाल नामित सदस्य विद्यापीठाच्या विरोधात कट-कारस्थान कसा काय करू शकतो, असा प्रश्न या सभेत उपस्थित झाला.
बुधवारी सिनेटच्या बैठकीमध्ये प्राध्यापक प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनी गेल्या बैठकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष असणारे आणि राज्यपालांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवर नामित केलेले सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी तक्रार केली होती. त्यांची कृती कुलगुरू आणि विद्यापीठाची बदनामी करणारी असून अशा व्यक्तीची राज्यपालांकडे तक्रार करून त्यांना त्वरित विद्यापीठातून काढण्यात यावे अशी ही मागणी होती. तसेच त्यांना विद्यार्थ्यांसह शैक्षणिक धोरणाबाबत सर्व प्रश्न व्यवस्थापन समितीच्या बैठकीत उपस्थित करण्याचे आणि ते सोडविण्याचे सर्व अधिकार आहेत. मात्र, असे असताना विद्यापीठाच्या बाहेर पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठावर मोर्चा काढू, तोडफोड करू, कुलगुरूंना पाहून घेऊ अशा स्वरूपाची भाषा वापरण्याचा प्रताप सूर्यवंशी यांनी केला आहे. अशा व्यक्तीवर कुलगुरूंनी कारवाई करायला हवी मात्र, कुलगुरूंनी या व्यक्तीची साधी तक्रारही राज्यपालांकडे केली नसल्याबाबत प्राचार्य ठाकरे यांनी सभागृहात खेद व्यक्त केला.
हेही वाचा - उपकुलसचिवांनी विद्यापीठाला लावला 39 हजारांचा चुना; कुलगुरुंनी दिले चौकशीचे आदेश