अमरावती- दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या विरोधात राज्यातील काही शहरांमध्ये विद्यार्थ्यांचा विरोध उफाळून आल्याचे पाहायला मिळत असले तरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षा हा ऑफलाईननच व्हाव्यात अशी प्रतिक्रिया पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
ऑनलाईन नकोच... दहावी-बारावीची परीक्षा सर्वांनाच हवी ऑफलाईन कोरोनामुळे इयत्ता दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम हा शिक्षकांनी ऑनलाईन शिकवल्यामुळे आमची परीक्षा ही ऑनलाईनच घेण्यात यावी, अशी मागणी करीत मुंबई आणि नागपूर या शहरातील विद्यार्थ्यांनी सोमवारी रस्त्यावर उतरून ऑफलाइन परीक्षेचा विरोध केला. विद्यार्थ्यांनी असा अचानक विरोध दर्शविल्यामुळे दहावी आणि बारावी ची परीक्षा खरोखरच ऑनलाईन व्हावी की ऑफलाईन व्हावी अशा चर्चांना उधाण आले. वास्तवात मात्र दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेची तयारी वर्षभर केली असल्याचे समोर आले आहे.
दहावी आणि बारावीचे वर्ग नियमित
कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद असून विद्यार्थ्यांचा अभ्यास हा ऑनलाईन पद्धतीने सुरू असला तरी जवळपास सर्वच शाळांमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांचा ऑफलाईन अभ्यास घेण्यात आला आहे. आमचा अभ्यासक्रम शाळेत नियमित स्वरूपात झाला असून आमची परीक्षा ऑफलाइन होण्यास हरकत नाही अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी 'ईटीवी भारत'शी बोलताना दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेताना शासनाच्यावतीने कोरोनाचा संसर्ग होणार नाही असे सर्व नियम निश्चितपणे पाळले जातील, असा विश्वासही अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे
परीक्षा ऑफलाईनच व्हावी
ज्या व्यक्तीचा शिक्षणाशी संबंध नाही अशा कोणत्याही व्यक्तीने परीक्षेसंदर्भात चिथावणीखोर वक्तव्य करून विद्यार्थ्यांना भरकवाटण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. कोरोना काळात विद्यार्थ्यांची काळजी घेण्याबाबत सरकारही समर्थ आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता दहावी आणि बारावीची परीक्षा ही ऑफलाईन व्हावी अशी आमची भूमिका असून काही विद्यार्थ्यांनी राज्यात एक-दोन ठिकाणी सोमवारी जो काही गोंधळ घातला. तो अयोग्य असून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मात्र परीक्षा ऑफलाइन घेण्यावर ठाम आहेत आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे युवक काँग्रेसचे नेते वैभव वानखडे 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना म्हणाले.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाइनच घेण्यात याव्या अशी आमची पूर्वीपासूनच भूमिका असून ऐऱ्यागैऱ्या कोणत्याही व्यक्तीने विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे योग्य नाही. शासनाने दहावी आणि बारावीची परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घ्यावी अशी आमची भूमिका असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर प्रमुख चिन्मय भागवत यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना स्पष्ट केले. तसेच माझ्यासह सर्व शिक्षकांची भूमिका या परीक्षा ऑफलाईनच व्हाव्यात अशी आहे. मी शिक्षक असले तरी यावर्षी दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्याची मी आई आहे. त्यामुळे माझ्या मुलाची परीक्षा ही ऑफलाईनच व्हायला हवी. विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी घेऊनच या परीक्षा घेतल्या जाणार आहे, असे शिक्षिका आणि पालक असणाऱ्या शरयू ठाकरे 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना म्हणाल्या. शिवाय ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे ऑफलाईनच परीक्षा घेतल्या जाव्यात अशी मागणी ग्रामीण भागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.