अमरावती :विदर्भातील दुसरे महत्त्वाचे शहर असणाऱ्या अमरावतीच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील समृद्धीसाठी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झालेल्या शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाला कॉरिडॉरद्वारे जोडणे गरजेचे आहे. नाशिकला असा कॉरिडॉर शक्य झाला असून अमरावती देखील यासाठीची मागणी आता व्हायला लागली आहे.
अमरावतीपर्यंत तीन मार्ग : समृद्धी महामार्गावरून अमरावतीला येणाऱ्या वाहनांसाठी अमरावती शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी 60 किलोमीटरवर असणाऱ्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील आसेगाव आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा पासून 66 किलोमीटर अंतर गाठावे लागते. यापैकी सर्वात जवळ असणाऱ्या शिवणी पासून अमरावतीपर्यंत येण्यासाठी एक ते दीड तास लागतो. त्यातही बऱ्याच ठिकाणी मार्ग खराब असल्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करून आल्यावर हा दीड तासाचा प्रवासाचा अनुभव अतिशय खराब येतो.
तीस किलोमीटरचा कॉरिडॉर शक्य : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथून अमरावती शहरालगत बडनेरा जेरी मंदिरापर्यंत 30 किलोमीटरच्या अंतरापर्यंत या कॉरिडॉरची निर्मिती होणे शक्य आहे. बडनेरा मार्गावरील जिरी येथून नागपूर महामार्गावरील रहाटगाव पर्यंत सध्या ध्रुतगती महामार्ग सुरू आहे. हा कॉरिडॉर झाल्यास वरुड मोर्शी चांदूरबाजार अचलपूर अंजनगाव सुर्जी या भागातील संत्रा उत्पादकांना तसेच कापूस उत्पादकांसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे.