अमरावती- शहरात क्रिकेटचा सट्टा मोठ्या प्रमाणात खेळला जात असून यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असून तरुणपिढी बरबाद होत आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन याविरोधात त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी आज नगरसेवक दिनेश बूब यांच्या नेतृत्वात शिवटेकडी मित्रमंडळाने पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्याकडे केली.
'शहरातील क्रिकेट सट्ट्याविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत' - BETTING
अमरावती शहरात क्रिकेट सट्ट्याच्या नादाला लागून अनेक सदन कुटुंबातील युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील सर्वच स्तरातील कुटुंबातील तरुण क्रिकेट सट्ट्याच्या नादात बरबाद होत आहेत.
सोमवारी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुगनचंद गुप्ता यांचा मुलगा क्रिकेट सट्ट्यात पैसे उधळत असल्याने मुलासोबत वाद झाल्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यापूर्वीही अमरावती शहरात क्रिकेट सट्ट्याच्या नादाला लागून अनेक सदन कुटुंबातील युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील सर्वच स्तरातील कुटुंबातील तरुण क्रिकेट सट्ट्याच्या नादात बरबाद होत असल्याने पोलीस प्रशासनाने अमरावती शहरातील क्रिकेट सट्टयावर आळा घालावा, यासाठी धडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शहरात कुठे जुगार चालतो याची माहिती मला सांगावी मी नक्कीच कारवाई करतो, असे पोलीस आयुक्तांनी सांगितल्याचे दिनेश बूब म्हणाले.
पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करताना दिनेश बूब यांच्यासह अॅड. श्रीकांत खोरगडे, रमेश परमार, प्रवीण वाडेकर, प्रदीप देशमुख, अविनाश भडांगे, संजय हिमाने, प्रकाश धोटे, सुनील डहाके आदी उपस्थित होते.