अमरावती Dasara Special Story : अमरावतीच्या ग्रामदैवत असणाऱ्या कुलस्वामिनी अंबादेवी आणि एकवीरा देवी यांच्या सीमोलंघनासाठी अमरावती शहरातील दसरा मैदान येथे दसरा मेळावा आयोजित केला जातो. दरम्यान, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीनं गत 93 वर्षांपासून या दसरा मेळाव्यात अतिशय शिस्तबद्धरीत्या युवक चित्त थरारक कवायती सादर करतात. या खास कवायतींचा सराव सध्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर सुरू आहे.
असा आहे इतिहास :अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या युवकांना सैनिकी प्रशिक्षण मिळावं यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन संरक्षण दलाची स्थापना केली. अमरावती शहरात श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी यांच्या यात्रेनिमित्त मोठी गर्दी होत असल्यानं मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला असणाऱ्या हनुमान व्यायाम शाळेत नवरात्र उत्सवाच्या दिवसांमध्ये युवकांना सैनिकी प्रशिक्षण दिले जायचं. या सैनिकी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून हनुमान व्यायाम शाळेच्या वतीनं 1930 मध्ये श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी या दसऱ्याच्या पर्वावर शहरातील सीमा ओलांडून परत मंदिराकडे वळतात, त्या ठिकाणी या प्रशिक्षित युवकांकडून कवायतींचे आयोजन करण्यास सुरुवात झाली. 1930 पासून सुरू झालेल्या ह्या कवायती आतापर्यंत सुरू असून अमरावती शहरातील दसरा महोत्सवाची खास ओळख या कवायतींनी निर्माण केली आहे.
असे होते सादरीकरण :श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे तीन ते चार हजार विद्यार्थी विविध खेळांचे प्रात्यक्षिक दसरा मेळाव्यात सादर करतात. यामध्ये प्रामुख्यानं सामूहिक कराटे, मल्लखांब,मार्शल आर्ट, जिम्नॅस्टिक, लेझीम,एरोबिक्स, बॉडी बिल्डिंग, रशियन ड्रिल, ढाल, तलवार, दांडपट्टा, भाला, डंबेल्स, तायकांडो असे सुमारे 30 ते 35 थरारक कवायती दसरा महोत्सवात सादर केल्या जातात.