अमरावती MLA Balwant Wankhade Car Accident : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव सुर्जी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे बळवंत वानखडे हे आमदार आहेत. त्यांच्या गाडीला दर्यापूर अमरावती मार्गावर असणाऱ्या लाखापूर फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, चौघे जखमी झाले आहेत. यावेळी आमदार बळवंत वानखडे हे याच गाडीच्या मागं जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनातून येत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
भरधाव वाहनानं दिली ट्रॅक्टरला धडक : आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार बळवंत वानखडे हे दर्यापूरवरुन अमरावतीला येत होते. यावेळी आमदार बळवंत वानखडे हे आमदार यशोमती ठाकूर यांच्या गाडीत बसले होते. आमदार बळवंत वानखडे यांची गाडी समोर सुसाट वेगानं निघाली होती. दरम्यान, लाखापूर फाट्याजवळ आमदार बळवंत वानखडे यांच्या भरधाव वेगात असणाऱ्या वाहनानं कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला.
आम्ही नागपूरहून दर्यापूरला येत असताना, आमदार यशोमती ठाकूर यांचा दर्यापूरला कार्यक्रम असल्यामुळं मी अमरावतीवरून माझ्या वाहनातून त्यांच्या वाहनात बसलो. माझ्या गाडीत माझा सचिव आणि ड्रायव्हर हे दोघंजण होते. लाखापूर फाट्याजवळ मजुरांचा ट्रॅक्टर रस्त्यावर उभा होता. ड्रायव्हरला हा ट्रॅक्टर न दिसल्यानं हा अपघात झालाय. या अपघातात मोहम्मद खलिल यांचा मृत्यू झालाय. याचं मला अतिशय दुःख आहे - आमदार बळवंत वानखडे
पोलीस घटनास्थळी दाखल : या भीषण अपघातात ट्रॅक्टरमध्ये असणारे मोहम्मद खलिल हे घटनास्थळी ठार झाले. तर कापसाच्या ट्रॅक्टरमध्ये असणारे पाच मजूर गंभीर जखमी झालेत. गंभीर जखमी असणाऱ्या दोन मजुरांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलंय. हे सगळे दर्यापूर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील घटनास्थळाकडे धाव घेतली होती.
हेही वाचा :
- नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, आठ जण जागीच ठार, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश
- लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; भीषण अपघातात सहा जण ठार, एक गंभीर