अमरावती -कांदा पिकावरअंजनगाव सुर्जी तालुक्यातील काही भागात रोग आल्याने शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. अंजनगाव तालुक्यात कांदा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून हंतोडा, पांढरीसह काही भागात अचानकपणे रोग आल्याने शेतातील कांद्याच्या पात्या संपूर्णपणे पिवळ्या पडल्या असून कांद्याची वाढ खुंटली आहे.
खत फवारणी करून सुद्धा रोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी येणाऱ्या या पिकाची आता आशाच मावळल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकरिता हजारो रुपये खर्च केले. परंतु, कांद्यावर आलेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात उत्पादनावर परिणाम झाला आहे.