अमरावती -यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असतानाच सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरले गेले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अनेक शेतात पाणी शिरले असून कापूस, सोयाबीन, उडिद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्र्याच्या मागणीवरही अतिवृष्टीचा परिणाम झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
अमरावतीत अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान, सततच्या पावसामुळे सोयाबीन सडले पंधरा दिवसापासून सलग पाऊस कोसळत असल्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून जवळपास गेल्याच आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी साचले असल्याने सोयाबीनला कोंब फुटल्याने हे पिक आता निरुपयोगी झाले आहे. चांदूर बाजार तालुक्यात जळका जगताप या गावात अनेक शेतांमध्ये पाणी तुंबल्यामुळे या भागातील सोयाबीन पूर्णतः हा खराब झाले आहे. त्यामुळे पिकाला लावलेला खर्च सुद्धा परत मिळणे कठिण असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सद्या सोयाबीनला बाजारात चांगली मागणी असताना पावसामुळे मात्र सोयाबीनचे दर अडीच ते तीन हजारापर्यंत घसरले आहेत. यामुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे.
संत्रा बाग आणि कापसाचेही मोठे नुकसान
संत्राच्या बागेमध्ये सुद्धा पाणी तुंबले आहे. बागेकडे जाणारे मार्गही या पावसामुळे खरडून निघाली असून संत्रा खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांनीही यावर्षी संत्र्याकडे पाठ फिरवली आहे. 40 हजार रुपये टन असा दर संत्र्याला असतो. सध्या केवळ 15 हजार ते 16 हजार रुपये याप्रमाणे मागणी केली जात असल्यामुळे संत्रा बागायतदार अक्षरशः हादरले आहेत. तर कापूस वेचण्यापूर्वी अतिवृष्टीमुळे कापसाचे बोंड सडले आहेत. सोयाबीनप्रमाणेच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात घेतला जाणारा कापूस वाया गेल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या दुःखात भर पडली आहे. नऊ ते दहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे दर असणाऱ्या कापसाचा दर आता पाच हजार रुपयांपर्यंत घसरला आहे.
33 टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान
कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 6 लाख 72 हजार 392 हेक्टर क्षेत्र खरीप हंगामात पेरणीखाली आले. एकूण 96 टक्के पेरणी झाली असताना, पावसाचे संतुलन बिघडल्यामुळे जिल्ह्यातील 15 हजार 221 हेक्टर शेतजमीन खरडून निघाली. तर 2 लाख 22 हजार 410 हेक्टर क्षेत्रातील एकूण 33 टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा -गंगापूर तालुक्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; अनेक गावांचा संपर्क तुटला