अमरावती -शहरातझालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी (Amravati Curfew) लावण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये फक्त अत्यावश्यक दुकानांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती मागील सहा दिवसांपासून बंद आहे. याचा फटका जिल्ह्यातील शेतकर्यांना (Amravati Curfew Impact) बसत आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि या हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. परंतु बाजार समितीच बंद असल्याने सोयाबीन व आदी शेतमाल विकावा तरी कुठे? असा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे तत्काळ बाजार समिती सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन पीक घरी आल्यानंतर शेतकऱ्यांची लगबग रब्बी हंगामासाठी सुरू झाली आहे. सध्या शेतकरी हरभरा, गहू आणि कांदासह आदी रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी लागवडीला खर्च येतो. शेतमाल विकून शेतकरी आपल्या शेतात रब्बी हंगामाची तयारी करत असतात. परंतु सहा दिवसांपासून संचार बंदीमुळे अमरावती बाजारपेठ पूर्णतः बंद आहे. त्यामुळे शेतमाल विकावा कुठे असा सवाल शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. परंतु मागील सहा दिवसांपासून येथील व्यवहार पूर्णतः ठप्प झाले आहे.
'लागवड करावी कशी?'