अमरावती -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती शहरातील बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आज तीन महिन्यांनंतर बाजारपेठा उघड्या करण्यात आल्या आहेत. मात्र, दुकाने उघडताच बाजारेपेठेत नागरिकांची गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचादेखील फज्जा उडाला होता.
रस्त्यांवर आज अमरावतीकरांची गजबज -
तीन महिन्यांपासून शुकशुकाट असणाऱ्या बाजारपेठेतील रस्त्यांवर आज अमरावतीकरांची गजबज होती. शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, राजापेठ, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट, सरोज चौक, जवाहर गेट, चित्र चौक, इटवरा बाजार, गांधी चौक, गडगेनागर, शेगाव नाका, चोराशी पुरा आणि बडनेरा परिसरात रस्त्यांवर गर्दी उसळली होती. दरम्यान, शहरातील काही भागात रस्त्यांची कामे सुरू असल्याने जयस्तंभ ते जवाहर गेट, सरोज चौक ते चित्रास चौक, शाम चौक ते सरोज चौक अशा गर्दीच्या मार्गांवर जड वाहनास प्रवेश बंदी करण्यात आली होती.