अमरावती -राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तरी देखील लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यावेळी लसीकरण केंद्रांवर आणखी गर्दी वाढेल, गर्दी वाढल्याने आमच्या लसीकरणाचे काय होणार? असा सवाल वृद्धांनी व्यक्त केला आहे. गर्दी वाढत असल्याने वाढत्या गर्दीची धास्ती वृद्धांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
दसरा मैदान येथील महापालिकेच्या रुग्णालयात सध्या लसीकरण सुरू आहे. या केंद्रावर लस घेण्यासाठी राजापेठ, साईनगर, दस्तुरनगर, गोपाल नगर या परिसरातील नागरिक येत आहेत, त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी देखील लसीकरण सुरू आहे. या लसीकरण केंद्रावर शहरातील गाडगेनगर, नवसारी, कठोरा नाका, रुख्मिणी नगर, कॅम्प परिसर या भागातील नागरिक येत आहेत. तर शहरातील दंत महाविद्यालयातील लसीकरण केंद्रावर तपोवन, वडाळी, बिच्चू टेकडी, एसआरपी कॅम्प परिसरातील रहिवासी गर्दी करत आहेत.