अमरावती :मान्सून पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मेळघाटातील आदिवासी बांधवांनी सादर केलेले विविध आदिवासी नृत्य हे उद्घाटन सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. स्थानिक आदिवासी बांधवांनी ढोलकीच्या तालावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन त्यांच्या नृत्यद्वारे सादर केले. यावेळी सिपना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मेळघाटातील पर्यटनाचे महत्त्व विशद केले.
वालुकाशिल्पही ठरले आकर्षण :आतापर्यंत वालुका शिल्प हे समुद्राच्या किनाऱ्यावरच पाहायला मिळायचे. आयोजित मान्सून पर्यटन महोत्सवात पहिल्यांदाच सातपुडाच्या उंच शिखरावर नागपूर येथील वाळू शिल्प कलावंत विनायक निटूरकर यांनी गाविलगड किल्ला, चंद्रयान तीन उड्डाण तसेच वनविभागाचे चित्रण रेखाटले.
रानभाज्यांनी पर्यटकांना आकर्षिले :मान्सून पर्यटन महोत्सवात सिपना महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या रानभाज्यांच्या स्टॉलने पर्यटकांना खास आकर्षित केले. कर्करोगासह अनेक आजारांवर उपयुक्त असणाऱ्या रानवांग, पानफुटी, मीठ निम, सीता लक्ष्मण, तुळस भुई, आवळा अशा विविध भाज्यांची माहिती या महोत्सवानिमित्त पर्यटकांना खास उपलब्ध करून देण्यात आली.