अमरावती - गेल्या दोन-तीन दिवसातील जोरदार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. शेतीलाही याचा फटका बसला आहे. १४ पैकी सहा तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चांदूरबाजार वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये घरांची पडझड झाली आहे.
हेही वाचा -Mumbai Nirbhaya Case : घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
- ८८० हेक्टरमधील पिके पावसामुळे खराब झालीत -
अमरावती जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील ८८० हेक्टर शेती खराब झाली असून, ३६९ घरांची पडझड झाली आहे. यापैकी नऊ घरे पूर्णत: पडली असून, ३६० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान दर्यापूर तालुक्यात झाले. या तालुक्यातील ५५५ हेक्टरमधील पीक खराब झाले. त्याखालोखाल १२० हेक्टर शेती पिके धामणगाव रेल्वे तालुक्यात खराब झाली असून, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९२, वरुड तालुक्यातील ७८, मोर्शी तालुक्यातील २० आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १५ हेक्टरमधील शेती पिके खराब झालीत. अशाप्रकारे जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील ८८० हेक्टरमधील पिके पावसामुळे खराब झाली आहेत.
- मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात मोठे नुकसान -
गेल्या चार दिवसांपासूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील १२१ गावांमध्ये कहर झाला. धामणगाव रेल्वे, भातकुली आणि तिवसा तालुक्यातील अनुक्रमे २७, २३ आणि २२ गावांमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली. या अतिवृष्टीमुळे ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी अमरावती व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येकी तीन तर वरुड, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रत्येकी एक अशाप्रकारे नऊ घरे पूर्णत: कोलमडली. तर ३६० घरांना अंशत: फटका बसला. अंशत: फटका बसलेल्यांमध्ये सर्वाधिक ८७ घरे तिवसा तालुक्यातील असून भातकुली तालुक्यातील ७६, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५१, अमरावती तालुक्यातील ४९ तर दर्यापूर तालुक्यातील ३३ गावांचा समावेश आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतील पावसामुळे जिल्ह्यात एक व्यक्ती वाहून गेला. मृत व्यक्ती अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे.
हेही वाचा -गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' आहेत नावे