अमरावती -शेतात येऊन पाहणी करून गेलो. कापूस वेचणीला आला होता, तर संत्रा तोडायचे होते. आता एक ते दोन दिवसात कापूस वेचायचा आणि संत्रा देखील तोडायचे ठरवले. मात्र, गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळला. त्यामध्येच गापीटीनेही भर टाकली आणि सर्व काही होत्याचे नव्हते झाले. अशी अवकळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.
गेल्या ४ दिवसांपासून विदर्भातील ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी सकाळी पावसासह गारपिटीने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अमरावतीमध्ये मोर्शी, तिवास, वरूड, चांदूर बाजार तालुक्याला याचा फटका बसला आहे. यामध्ये तूर, गहू, कापूस, संत्रा, केळी, हरभरा, भाजीपाला ही पीके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
राजू गरडे यांनी त्यांच्या शेतात कापूस आणि तूर पीक लावले होते. सर्व काही चांगले होते. यंदा तुरीचे उत्पादन देखील जास्त होणार होते. तसेच कापसाची १ वेचणी झाली होती. दुसऱ्या वेचणीला कापूस आला होता. त्यांनी बुधवारी रात्री जाऊन कापसाची पाहणी केली. आता मजूर पाहून १ ते २ दिवसात कापसाची वेचणी करायचे ठरवले. मात्र, गुरुवारी रात्री पावसासह गारपीट झाली आणि कापूस पूर्ण जमीनदोस्त झाला. त्याच्यासोबतच तूर पिकाचेही अतोनात नुकसान झाले.