अमरावती - कोरोना काळात केंद्र सरकारने किती दिवे लावले, किती ताट वाजवले हे संपूर्ण देशाला व जगाला माहीत आहे. केंद्र सरकारची अब्रु संपूर्ण जगाने बाहेर काढली आहे. त्यामुळेच आता राज्यांतील चार नवीन मंत्र्यांना इंजेक्शन देऊन त्यांना फुगवून यांनी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे, अशी जहरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर केली आहे. हे जन आशीर्वादाचे धनी नाही तर हे खरे पापाचे धनी आहेत, अशी टीकाही आमदार भुयार यांनी केली आहे.
भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेवर विरोधकांची टीका -
केंद्र सरकारच्या योजना, केंद्र सरकारने केलेले कामे हे जनतेपर्यंत पोहवण्यासाठी भाजपाकडून राज्यभर जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, नारायण राणे, डॉ. भारती पवार आणि डॉ. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात झाली आहे. भाजपचे चार नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. दरम्यान, या यात्रेवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.