अमरावती- लोकसभेच्या अमरावती मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ, वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे आणि बसपाचे अरूण वानखडे या तिघांचाही समावेश आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती स्पष्ट केली आहे.
खासदार अडसूळ यांच्या विरोधात २००९ मध्ये दर्यापूर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा, तर २०१८ मध्ये राजापेठ पोलीस स्टेशनध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा अद्यापही चौकशीत असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या विरोधात नांदगाव पेठ आणि गडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. यामध्ये धमकावणे आणि जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे.