अमरावती -अमरावती महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात फ्रेजारपुरा पोलिसांनी पालिका कर्मचाऱ्याला अटक केली असून, अन्य तिन फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महापालिकेत कंत्राटी कर्मचारी असणाऱ्या प्रदीप नितनवरेची प्रतीक नावाच्या तरुणाने त्याच्या मैत्रिणीशी ओळख करून दिली होती. तेव्हा महापालिकेत जागा आहे. मी तुला नोकरी लावून देतो. तू तुझे सर्व शैक्षणिक कागदपत्रं घेऊन माझ्याकडे ये, असे आरोपीने या मुलीला सांगितले. त्यानुसार सर्व कागदपत्रे घेऊन ती त्याच्याकडे आली. यावेळी प्रदीपने तिला गुंगीचे औषध घातलेले पाणी प्यायला दिले. ती बेशुद्ध पडल्यावर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्यानंतर या मुलीला बॅकमेल करून तो वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. एक दिवस माझ्या काही वरिष्ठांना तू शरीरसुख दे, त्यानंतर मी तो व्हिडीओ कायमचा डिलिट करतो, असे त्याने या मुलीला सांगितले. त्यानंतर अन्य तिघांनी देखील तिच्यावर अत्याचार केला.