अमरावती:गाईचे शेण आणि या शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या गोवऱ्या या, आजच्या पिढीतील शहरी भागात राहणाऱ्या लहान मुलांसाठी विचित्रपणा वाटत असले तरी, वास्तवात परंपरेनुसार गाईच्या शेणाला आणि या शेणाच्या गोवऱ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रचंड महत्त्व आहे. ग्रामीण भागात आज घरोघरी गॅस सिलेंडर पोहोचले आहे. तरी अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी गोवऱ्यांचा वापर केला जातो. आज पासून दहा पंधरा वर्षांपूर्वी गोवऱ्या या अर्थार्जनासाठी उपयुक्त ठरू शकतात अशी कल्पना देखील अशक्य होती. आज मात्र चक्क गोवऱ्यांचा बिजनेस वाठोडा शुक्लेश्वर येथील मनीषा बनसोड यांनी सुरू केला आहे. त्याचा गोवऱ्या विकण्याचा बिजनेस असल्याचे त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. घरी असणाऱ्या गाई म्हशीच्या शेणाद्वारे मनीषा बनसोड आणि त्यांच्या सासू शेणाच्या गोवऱ्या थापतात. आता गावात पूर्वीप्रमाणे गोवऱ्या भेटत नसल्यामुळे, अनेकांना रोडगे करण्यासाठी गवऱ्यांची गरज लागते. होळी सीझनमध्ये गोवऱ्यांना प्रचंड मागणी असते. या गोवऱ्या विकून चांगले पैसे मिळतात असे मनीषा बनसोड सांगतात.
गोवऱ्या शेणखत तयार करण्याची ऑर्डर: आज अनेक शेतकरी आपल्या शेतात उत्कृष्ट पीक यावे यासाठी शेणखताचा वापर करत आहे. आमच्या वाठोडा शुक्लेश्वर या गावासह लगतच्या परिसरातील अनेक शेतकरी आमच्याकडे शेणखताची ऑर्डर देतात. ऑर्डर प्रमाणे आम्ही शेणखत तयार करतो. यासोबतच गोवऱ्यांची ऑर्डर देखील येते. गत दोन अडीच वर्षांपासून गोवऱ्या आणि शेणखताचा बिझनेस सुरू केला. या माध्यमातून आम्हाला चांगले पैसे मिळतात असे देखील मनीषा बनसोड यांनी सांगितले.