अमरावती - कोरोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांवर शहरातील 'सुपर स्पेशालिटी' रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. यासाठी 100 आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त पियुष सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या देखरेखीत कोरोनाग्रस्तांचा इलाज केला जाणार आहे.
अमरावतीचे 'सुपर स्पेशालिटी' रुग्णालयात होणार आता कोरोनाग्रस्तांचा इलाज अमरावती शहर आणि जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, दिल्ली येथे आयोजित मर्कझ या धार्मिक कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील अनेक लोक सहभागी झाल्याचा अंदाज आहे. यापैकी केवळ 32 जणांची ओळख पटली असून, यापैकी 9 जण हे अमरावती जिल्ह्यात परतले नाहीत. तर 23 जणांपैकी काहींचे त्यांच्याच घरात विलगिकरण करण्यात आले आहे. तसेच काहींना शासकीय विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
मर्कझमधून नेमके किती लोक जिल्ह्यात परतले याचा अंदाज आता जिल्हा प्रशासनालाही नाही. यामुळे येत्या काही दिवसात कोरोनचव संकट जिल्ह्यावर ओढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक वेगाने काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सुपर स्पेशालिटी रुगणलाय पूर्णतः कोरोना रुग्णांसाठी सज्ज राहणार आहे.
'सुपर स्पेशालिटी' रुग्णालयात 100 डॉक्टर, परिचारिका, अटेंडन्ट, लॅब असिस्टंट, सुरक्षारक्षक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे आळीपाळीने सेवा देणार आहेत. रुग्णालयाच्या तळमजल्यावर नोंदणी विभाग तयार करण्यात आला आहे. पहिल्या मजल्यावर कोविड-19 संशयितांची तपासणी आणि विलगिकरण कक्ष एक आणि दोन. तसेच दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभाग एक आणि दोन निर्माण करण्यात आले आहेत. हे रुग्णालय 100 खाटांचे आहे. त्यातील 60 खाटा पॉझिटिव्ह रुग्णांसाठी तर 40 खाटा या कोरोना संशयित रुग्णांसाठी आहे.