अमरावती - तरुबांदा वनपरिक्षेत्र कार्यालयात प्रवेश करताच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीन लाकडी खांबांवर पृष्ठाचे छोटेसे खोके लटकावले दिसतात. या खोक्यांवर जिओ, आयडिया आणि बीएसएनएल असे लिहून ठेवण्यात आले आहे. हे पाहून नवख्या व्यक्तीला आश्चर्य झाल्याशिवाय आणि या प्रकाराविषयी कुतूहल झाल्याशिवाय राहणार नाही. 'ईटीव्ही भारत'ने याबाबत चौकशी केली असता, खोक्यांवर लिहिलेल्या दूरसंचार कंपनीच्या नावाप्रमाणे, संबंधित खोक्यात मोबाईल फोन ठेवेल्यास संबंधित कंपनीचे नेटवर्क मिळते. यामाध्यमातून या घनदाट जंगलातही आपल्याला जगभरात कुठेही संवाद साधाता येतो, अशी माहिती आकाश गोडकर या कर्मचाऱ्याने दिली आहे.
मेळघाटात मोबाईल नेटवर्क मिळणे फार दुर्लभ आहे. चिखलदरा आणि धारणी येथे काही प्रमाणात नेटवर्क मिळते. धारणी क्षेत्रालगतच्या मध्य प्रदेशातून नेटवर्क मिळते, तर काही दूरसंचार कंपन्या धारणी आणि लगतच्या भागात आता टॉवर उभारत आहेत. असे असले तरी परतवाडा शहर सोडून मेळघाटात प्रवेश करताच मोबाईल फोन निकामी होतात. दूर दूर पर्यंत मोबाईल फोनला नेटवर्क मिळत नाही. तारुबांदा हे गाव तर जंगलाच्या कोअर क्षेत्रात आहे. या ठिकाणी मोबाईल फोन लागणे ही कल्पना करणेही अशक्य. मात्र, वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या खांबावर एकाच ठिकाणी मोबाईल रेंज येणे आणि तिचा शोध लावणे हे खरोखर दिव्यच कार्य. याच जुगाड टेक्नॉलॉजीद्वारे एक नव्हे तर तीन कंपन्यांच्या मोबाईलचे नेटवर्क शोधण्यात तारूबांदा वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी आकाश गोडकर यांना यश मिळाले आहे.