रत्नागिरी -केंद्रीय नवोदय विद्यालयाच्या सहावी इयत्तेत प्रवेश मिळावा, याकरता परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्थानिक शिक्षकांच्या मदतीनं केलेली फसवणूक उघड झाली आहे. नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा, याकरता स्थानिक विद्यार्थ्यांनीच परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे पेपर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार राजापूर तालुक्यातील जानशी येथे उघड झाला आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी कबुली दिली आहे.
नवोदय विद्यालयात 70 पैकी 44 विद्यार्थी परजिल्ह्यातील
प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय नवोदय विद्यालय आहे. यात स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्यानं प्रवेश मिळावा असा नियम आहे. पण, सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील पडवे येथे असलेल्या या नवोदय विद्यालयात 70 पैकी तब्बल 44 विद्यार्थी हे परजिल्ह्यातील असल्याचं सध्या समोर येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. नवोदय विद्यालयाच्या सहावी इयत्तेत प्रवेश मिळण्याकरता विद्यार्थ्याने पाचवीची परीक्षा ही त्याच जिल्ह्यातील शाळेमधून दिलेली असावी असा नियम आहे. आणि याकरताच हा सारा प्रकार केला जात असल्याचं बोललं जात आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी नामी शक्कल जिल्हा परिषदेकडून प्रकरणाची दखल
दरम्यान जानशी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बलवंत सुतार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र जिल्हापरिषद अध्यक्ष, शिक्षण विभाग यांनी या साऱ्या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेतली असून, मुख्याध्यापक हे राजकीय वरदहस्तामुळे अरेरावीची भाषा करत असल्याची चर्चा सुरू आहे.