अमरावती - जिल्ह्यातील हौशी पर्यटकांनी देशांतर्गत आणि परदेशवारीसाठी असलेले नियोजन कोरोनाच्या धास्तीमुळे रद्द केले आहे. मार्च ते जुलै दरम्यान भरभरून प्रतिसाद असणारा पर्यटन व्यवसाय सध्या संकटात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील 314 पर्यटकांनी आपली परदेशवारी रद्द केली आहे.
कोरोनाचा पर्यटन व्यवसायाला फटका अमरावती जिल्ह्यातील सुमारे 700 पर्यटकांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राज्याबाहेरील ठिकाणांना भेट दिली. 275 प्रवासी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर या देशात फिरण्यासाठी गेले होते. हे सर्व प्रवासी आपल्या घरी सुखरूप परतले आहेत. मार्च महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत अमरावती जिल्ह्यातील अनेकांनी देशांतर्गत आणि परदेशात पर्यटन करण्याचे नियोजन केले होते.
हेही वाचा -COVID-19 LIVE : भारतात दुसरा बळी; वाचा कोरोनासंबंधीच्या सर्व बातम्या एका क्लिकवर...
एकूण 471 अमरावतीकरांनी पर्यटनाची संपूर्ण तयारी केली होती, तर 335 जणांनी परदेशवारीचे नियोजन केले होते. दरम्यान, कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातून देशांतर्गत पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या एकूण 190 जणांनी बुकिंग रद्द केली आहे. परदेशवारीसाठी सज्ज असणाऱ्या 335 पर्यटकांपैकी 314 पर्यटकांनी बुकिंग रद्द केले असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास संचालनालयाचे अमरावती विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील हौशी पर्यटकांना पर्यटनासाठी हव्या त्या सुविधा पुरविणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीजला कोरोनामुळे 40 ते 50 कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याची माहिती, धनलक्ष्मी ट्रॅव्हल्स एजन्सीचे संचालक बबन कोल्हे यांनी दिली. मार्च ते जुलै दरम्यान पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस असतात. मात्र, कोरोनामुळे यावर्षी हा व्यवसाय संकटात आला आहे.
ट्रॅव्हल एजन्सीने पर्यटकांना परदेशवारी घडवण्यासाठी ज्या परदेशी विमान कंपन्यांचे तिकीट काढले आहे त्या तिकिटांची रक्कम संबंधित विमान कंपन्या देण्यास तयार नाही. पर्यटकांनी नेमक्या कुठल्या कारणामुळे आणि कोणत्या परिस्थितीत आपला प्रवास रद्द केला, याची जाणीव ठेवून विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या तिकिटाची रक्कम परत करायला हवी. यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. पर्यटकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी शासनाने घ्यावी, असेही बबन कोल्हे म्हणाले.