अमरावती - देशभरात आजपासून कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्यात कोरोनाचे 'हॉटस्पॉट' बनलेल्या अमरावती जिल्ह्यातही कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरूवात झाली. या लसीकरणामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आणि दुर्धर आजार असलेल्या लोकांना लसीकरण केले जात आहे.
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील लसीकरण केंद्रावर या लसीकरणाला सुरूवात झाली. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. सकाळपासून सुरू झालेल्या या लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अमरावती जिल्ह्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सद्यस्थितीत ६० हजार डोज प्राप्त झालेले आहेत. ग्रामीण भागांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर अमरावती जिल्ह्याला अधिक लसीचे डोस मिळणार आहेत.
लस मिळवण्यासाठी आधी नागरिकांना को-विन अॅपवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. ज्या लोकांकडे मोबाईल नाही किंवा ज्यांना मोबाईलची माहिती नाही, त्या नागरिकांना टोल फ्री नंबरवर फोन करून लसीकरणाची नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर लसीकरण केंद्रावर आधार कार्ड आणून त्यांना लाभ घेता येईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.