अमरावती - जिल्ह्याच्या बडनेरा आणि आकोली या दोन्ही परिसरात शुक्रवारी कोरोनाचे प्रत्येकी 3 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमरावतीत शुक्रवारी कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 312 वर पोहोचली आहे.
अमरावतीच्या बडनेरा, आकोली परिसरात कोरोनाचे थैमान; जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 312 वर
शुक्रवारी अमरावतीच्या बडनेरा आणि आकोली परिसरात कोरोनाचे प्रत्येकी 3 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे, जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 312 वर पोहोचली आहे.
आकोली परिसरात एका दाम्पत्याला कोरोना झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. यात शुक्रवारी आकोली परिसरात पुन्हा तीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 45 वर्षीय महिलेसह 12 आणि 3 वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. त्यामुळे, आता आकोली परिसरात कोरोनाचे 5 रुग्ण झाले आहेत. तर, बडनेरा जुनी वस्ती परिसरात कोरोनाने नव्याने शिरकाव केला आहे. शुक्रवारी बडनेरा जुनी वस्ती परिसरातील कंपसपुरा भागात 20 आणि 21 वर्षाच्या दोन युवकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यामुळे, बडनेरा परिसरात कोरोना रुग्णांची संख्या 7 झाली आहे.
जिल्ह्यातील चांदुर बाजार शहरात 55 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील एका आजारी महिलेवर अमरावतीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्यासोबत आलेल्या तिच्या पतीलाही कोरोना झाल्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला आहे. तर, दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे जिल्ह्यातील नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेतदेखील आणखी भर पडत आहे.