अमरावती - शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागात आज मतदान होत आहे. मात्र, जिल्ह्यातील चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसून आले. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एका अपक्ष उमेदवाराच्या बूथवर पाहावयास मिळाले. यामुळे शहरात विविध चर्चांना ऊत आले आहे.
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित झाल्यानंतर काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतर्फे उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. श्रीकांत देशपांडे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, चांदूर रेल्वेत महाविकास आघाडीच्या बूथवर फक्त शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारीच दिसून आले. येथे एकही काँग्रेस नेता, कार्यकर्ता आढळून आला नाही. हीच परिस्थिती नांदगाव खंडेश्वरमध्येसुद्धा दिसली. त्यामुळे, काँग्रेसतर्फे देशपांडे यांचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार काळबांडे यांचा प्रचार होत असल्याचा संशय शिवसेनेकडून व्यक्त होत आहे.