अमरावती :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील मुस्लिम होते, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी शुक्रवारी शिवप्रतिष्ठानच्यावतीने येथील जय भारत सभागृहात आयोजित सभेत केले होते. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. अमरावतीत या विषयावरून मागील तीन दिवसांपासून राजकारण तापले आहे. संभाजी भिडेंवर कारवाई करावी या मागणीसाठी आज आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यालयासमोर ठिय्या मांडून आहेत. दरम्यान भिडे यांच्या निषेधार्थ आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात शनिवारी राजकमल चौक येथे आंदोलन करण्यात आले होते. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर संभाजी भिडेंविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला. त्यांना रविवारी सायंकाळपर्यंत अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला होता.
यशोमती ठाकूर विरुद्ध कारवाईची मागणी :शिवप्रतिष्ठानच्यावतीने आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी रविवारी शेकडो धारकरी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धडकले होते. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या धारकऱ्यांचे नेतृत्व करीत आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली होती. संभाजी भिडेंची बाजू घेणाऱ्या खासदार अनिल बोंडे यांचा देखील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.
यशोमती ठाकूर यांना धमकी :संभाजी भिडे विरोधात आवाज उठवल्यामुळे कैलास सूर्यवंशी नामक व्यक्तीने सोशल मीडियावरून यशोमती ठाकूर यांना तुमचा दाभोलकर करू, अशा स्वरूपाची धमकी दिली आहे. या धमकीमुळे देखील काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.