अमरावती -दर्यापूर तालुक्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरिपाचे संपूर्ण पीक वाया गेल्याने शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहे. यासंबंधी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र अजुन मोबदला मिळाला नाही. तसेच सरकारनेही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी दर्यापूर युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकरी निवेदन देण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरली.
हेही वाचा - बियाणे वाटपात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका; वेतनवाढ थांबवली
सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी निवेदन देण्यासाठी तहसीलदार योगेश देशमुख यांच्याकडे गेले होते. मात्र तहसीलदार हे उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या दालनात असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी तिथे गेले. निवेदन देण्याआगोदर उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनामध्ये फक्त पाच शेतकरी येतील, असा आदेश दिला. यामुळे निवेदकांमध्ये खळबळ उडाली.