अमरावती- विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा 28 लाख असताना बडनेरा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून रवी राणा यांनी 40 लाखांपेक्षाही जास्त खर्च केला असल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या प्रकरणात फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या असून शिवसेनेने रवी राणा यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च; आमदार रवी राणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हेही वाचा -शरद पवारांचा वाढदिवस 'बळीराजा कृतज्ञता दिन' म्हणून होणार साजरा
जिल्हा खर्च नियंत्रण समिती बडनेरा विधानसभा, जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत दैनंदित छायांकित रजिस्टरमध्ये नोंद केलेल्या खर्चाची नोंद व आमदार रवी राणा यांनी सादर केलेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदीमध्ये 40 लाख 85 हजार 797 रुपयाची तफावत आढळून आली आहे. यामुळे आमदार राणा यांचा खर्च मर्यादेपेक्षा जास्त झाल्याची बाब निवडणूक आयोगाकडे निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी लक्षात आणून दिली. यानंतर जिल्हा खर्च नियंत्रण समिती समक्ष 20 नोव्हेंबरला रवी राणा यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. याप्रकरणात विशिष्ठ लेखापरीक्षण अंकेक्षण इतिवृत्त नोंदवून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी निरीक्षक आणि वरिष्ठ लेखापरीक्षक यांच्या स्वाक्षरीद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाला या भ्रष्ट प्रकाराचा अवलंब करून निवडणूक लढवण्याच्या प्रकरणात रवी राणा यांच्याविरोधात तक्रार नोंदवली.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बडनेरा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कणीचे यांना दिलेल्या पत्रात आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रवी राणा यांच्याकडून किराणा वाटपाबाबत वाटलेल्या व भातकुली पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या 3 हजार 310 कूपनची नोंद रजिस्टरमध्ये घेऊन निवडणूक आयोगाला माहिती देताना, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 123 व कलम 127 नुसार फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा -विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे रेल्वे प्रवाशांचे धरणे आंदोलन
तसेच 'आयी दिवाली भरलो किराणा, चुनके लावो रवी राणा' अशाप्रकारचे भ्रमणध्वनीद्वारे ध्वनिमुद्रित संदेश पाठवून आमदार रवी राणा यांनी मोफत किराणा देण्याचे आश्वासन देऊन स्वाभिमानी सहायता कार्ड छापून मतदारांना वितरित केल्याचे आढळून आले. हा प्रकार मतदारांना प्रलोभन देणे, या लाचखोरीच्या व्याख्येत येत असल्याने त्याबाबतही विशिष्ट गुन्ह्यांची नोंद करण्यात यावी यासाठी भातकुली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना स्वतंत्र पत्र देऊन गुन्ह्याची नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात पोलीस आयुक्तांकडून सूचना देण्यात आल्या असून स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या दबावामुळे भातकुली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. दरम्यान, हे प्रकरण गंभीर असून आमदार रवी राणा यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी आम्ही करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.