अमरावती- कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी अंजनगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कोरोना संदर्भात ग्रामीण रुग्णालयात आणि तालुक्यात होत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेण्याकरिता अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दि.१७ ला दुपारी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्यात.
शहरात भरत असलेल्या भाजी बाजारासंदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर बाजारात सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याकरिता दिलेल्या सूचनांचे आपण पालन का करित नाही, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केला. बाजारामध्ये दोरी लावून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला लावा, अशा सूचना अंजनगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन त्यांच्या कर्ज शैलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य अधिकाऱ्याची चांगलीच कानउघाडणी केली.