अमरावती - 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मागितलेली परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली आहे. आणखी 2 आठवडे महाविद्यालये बंदच राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरू करणे बंधनकारक नाही असेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी म्हटले आहे. अमरावती विभागात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मधल्या काळात अमरावती जिल्हा कोरोनामुक्त होत असल्याचे वातावरण होते. आता अचानक पुन्हा कोरोना वाढला असून अमरावती विभागात यवतमाळ, अकोला या जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. विभागात सध्या अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलयाची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. अमरावती शहरातील राजापेठ, बेलापूर, दस्तुरनगर, साई नगर आणि रुक्मिणी नगर या भागात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या भागात घरो-घरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.