अमरावती- हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावात जायला चांगला रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेला खाटेवर टाकण्यात आले. व त्यानंतर भर पावसात चिखल तुडवत रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आल्याची घटना घडली. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी करण्यात आली होती. परंतू ती पूर्ण झाली नाही. मात्र दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी एका दिवसात प्रशासनाने भर पावसात रस्ता बनवल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात जीवघेणे रस्ते असताना मुख्यमंत्र्यांसाठी एकाच दिवसात रस्ता बनतो. मग ग्रामीण भागात का नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.
मुख्यमंत्र्यांसाठी एका दिवसात बनला रस्ता; हिंगोलीत मात्र चिखल तुडवत गर्भवतीला नेले खाटेवरून - गरोदर महिलेला चिखल तुटवित
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही हिंगोलीतील एका गावात रस्ता नाही. त्यामुळे गरोदर महिलेला चिखल तुटवित रुग्णालयात न्यावे लागते. तर दुसरीकडे त्याच व्यवस्थेमधील सत्ताधीशांच्या काळजीपोटी भर पावसातही रस्ते उभारले जातात. जणू ही भारत आणि इंडियाची अनुभूती तर नाही...
हेही वाचा - स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावाला नाही रस्ता; चिखल तुडवीत गरोदर महिलेला खाटेवरून पोहोचवले रुग्णालयात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीतुन गुरुवारपासून सुरुवात होत आहे. करोडो रुपये खर्च करून काढण्यात येणारी ही महाजनादेश यात्रा महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. तत्पूर्वी अमरावतीच्या मोझरीमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री साहेबांना यात्रेदरम्यान धक्का लागू नये, यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भर पावसातही प्रशासनाने फडणवीसांसाठी एका दिवसात रस्ता बनवल्याचा साक्षात्कार केला आहे.