मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण अमरावती Eknath Shinde On Uddhav Thackeray:बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची संपत्ती आपल्याकडं आहे. हनुमान चालिसाच्या पठणावर बंदी घालणाऱ्या ठाकरे सरकारला पाडण्यात माझा वाटा आहे, महाराष्ट्रात आता सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी हनुमान गढी येथं धर्मोपदेशक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा वाचनाच्या कार्यक्रमाला भेट दिली.
राणा दाम्पत्याचं कौतुक :यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तसंच अर्ध्या तासाच्या भेटीदरम्यान त्यांनी राणा दाम्पत्याचं कौतुक करत आज देशाला प्रदीप मिश्रा यांच्या कामाची गरज असल्याचं सांगितलं. दोन वर्षांपूर्वी हनुमान चालिसाच्या पठणाला विरोध करणाऱ्यांची हनुमानाच्या कृपेनं सत्तेची लंका जाळली. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झालं. राम प्रभू आणि हनुमान यांच्या आशीर्वादानं राज्यात सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन झालं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.
बाळासाहेबांची इच्छा नरेंद्र मोदींनी केली पूर्ण :अयोध्येत रामाचं मंदिर व्हावं, ही बाळासाहेब ठाकरेंची खरी इच्छा होती. 'मंदिर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे', अशी टीका विरोधकांकडून सातत्यानं होत होती, मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाचं मंदिर बांधलं. आता भगवान श्रीरामाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण केलं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
संसदेत हनुमान चालीसाचं पठण :खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना हनुमान चालीसा पठण केल्याबद्दल 14 दिवस तुरुंगवास भोगावा लागला. या प्रकरणाचा माझा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी संसदेत निषेध केला. त्यावेळी विरोधकांनी माझ्या मुलानं संसदेत हनुमान चालीसाचं पठण करून दाखण्याचं आव्हानं केलं. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी न अडखळता संसदेत हनुमान चालीसा म्हणुन दाखवली, हा क्षण माझ्यासाठी खूप गौरवशाली असल्याचं शिंदे म्हणाले.
हेही वाचा -
- प्रेयसीला कारखाली चिरडलं; नवीन ट्विस्ट आला समोर, पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीवरून 'पायलट' लोगोच गायब
- "ज्यांनी अदानींची सुपारी घेतली, त्यांना ठेचून टाकू", उद्धव ठाकरेंचा धारावी बचाव आंदोलनात इशारा
- बडगुजरांवरील आरोपानंतर भाजपाचे मोठे नेते सलीम कुत्तासोबत? सुषमा अंधारेंनी दाखवला फोटो