अमरावती- शहरालगत समृद्ध असे पोहरा-मालखेड जंगल आहे. वन्यप्राण्यांनी समृद्ध असणारे हे जंगल प्लॅस्टिकमुक्त व्हावे या उद्देशाने दिशा फाउंडेशन या संस्थेने नवे पाऊल टाकले आहे. आजपासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून दर रविवारी राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात पर्यावरण प्रेमींसह जंगल परिसरातील रहिवाशांची मदत घेतली जाणार आहे.
वन्य प्राण्यांना हवे तसे वातावरण निर्मितीची संकल्पना वास्तवात उतरविण्याची दिशा फाऊंडेशनची धडपड आहे. गत काही वर्षांपासून पोहरा-मालखेड, वडाळी आणि चिरोडी हे जंगल घनदाट वाढले असून वाघ, बिबट, नीलगाय, हरणं, चितळ असे अनेक प्राणी जंगलात संचार करत आहेत. या जंगलात लहान वाघामाय आणि मोठी वाघामाय ही दोन प्राचीन मंदिरे अमरावती- चांदुर रेल्वे मार्गावर आहेत. तर शामामाय या देवीचे स्थान चिरोडी येथे घनदाट जंगलात आहे.
पोहरा-मालखेड जंगल प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मिळाली 'दिशा' या घनदाट जंगलात देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक जंगलातच प्रसाद म्हणून रोडगे, भाकरी असे जेवण शिजवतात. जेवणाच्या कार्यक्रमामुळे जंगलात प्लस्टिकसह मोठ्या प्रमाणात इतर कचरा जमा होतो. या भागात बाराही महिने पाण्याचा झरा असून भांडी घासण्यासाठी जंगलात सोबत आणलेले पावडर या झऱ्यात टाकण्याचा प्रकारही घडतो. हे सर्वकाही वन्य प्राण्यांसाठी घातक ठरणारे आहे. शामा माय मंदिर परिसरासह या जंगलात अनेक ठिकाणी गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिकच्या बाटल्या हे साहित्य फेकण्यात येते. हाच प्रकार पाहता वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या दिशा फाउंडेशन या संस्थेने जंगल प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाबाबत दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष यादव तरटे यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. आपले जंगल अधिक समृद्ध व्हावे यासाठी प्लास्टिक कचरा जंगलात टाकू नये, असे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या दिवसात आम्ही या भविकांनाही जंगल स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेऊ, असे यादव तरटे म्हणाले.