अंजनगाव सुर्जी (अमरावती) -येथील नगर परिषदेकडून घनकचरा व्यवस्थापनाचे काम रोज युद्धपातळीवर चालते. नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट काढून मोकळी होते. परंतु, कंत्राटदार संस्था व नगरपरिषद रोजंदारीवर कामे करणाऱ्या मजुरांच्या समस्येविषयी जागरूक नसल्याचे दिसत आहे.
स्थानिक नगरपरिषदेमध्ये घनकचरा व्यवस्थापन करणारे रोजंदारी स्वच्छता मजूर काेराेनाच्या आपत्तीतही सुरक्षा साधनांशिवाय गावातील स्वच्छता ठेवण्याचे कार्य करत आहेत. संपूर्ण गाव स्वच्छ करणारे हे स्वच्छता दूत गमबूट, ग्लोज, सॅनिटायझर, तोंडाच्या माक्स विनाच काम करीत असल्याचे आढळून आले आहे.
या स्वच्छता कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यापासून पगार नसल्याने पगाराविना त्यांच्या संयमाचा ताेल ढासळत आहे. मागील कार्यकाळात घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट असणाऱ्या क्षितीज बेरोजगार नागरी संस्थेने रोजंदारीवर काम करणार्या मजुरांच्या रोजंदारीतून १ जानेवारी २०१९ ते मार्च २०२० पर्यंत ई.पी.एफ कापून घेतला. परंतु, ही कापून घेतलेली रक्कम अद्याप मजुरांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरल्याचे समजते, आपल्या आरोग्याची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत कोणीही बोलायला तयार नसून कोरोनाच्या महामारीत त्यांचे पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
वित्तीय चालू वर्षातील कंत्राटी संस्था कनक एंटरप्राईजेस, अमरावती यांनी सफाई कामगार मजुरांच्या समस्येवर लवकरात लवकर चर्चा करून तोडगा न काढल्यास कंत्राटी कामगारांच्या वतीने शिवसेना उपशहर प्रमुख सचिन गावडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.