अमरावती :मराठा सेवा संघात जिजाऊ बँकेच्या विकासामुळे फुट पडली आहे. कुठलीही बँक ही एखाद्या धर्माच्या किंवा समाजाच्यासाठी नसून ती सर्वसमावेशक असावी, अशा रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निर्णयामुळे 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या उद्देशाने मराठा सेवा संघाने सुरू केलेली बँक ही केवळ मराठा सेवा संघाची होऊ शकत नाही, असे स्पष्ट होते. यामुळे बँकेच्या संचालकांनी सर्व कागदपत्रांवरून मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ बँक असा उल्लेख वगळून केवळ जिजाऊ कमर्शियल बँक असा ठेवला आहे.
बँकेची प्रगती :दरम्यान जिजाऊ बँकेच्या संचालकांनी मुद्दाम मराठा सेवा संघाचे नाव वगळल्याचा आरोप बँकेचे माजी संचालक अरुण गावंडे यांनी केला. विशेष म्हणजे या संदर्भात थेट मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली. या संपूर्ण प्रकारामुळे जिजाऊ बँकेचे सर्व संचालक आणि मराठा सेवा संघाचे अन्य पदाधिकारी यांच्यात वितृष्ठ निर्माण झाले. आता बँकेने प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे. ही बँक आता काही जणांना स्वतःकडे हवी आहे, यामुळेच हा सर्व वाद निर्माण केला जात असल्याची माहिती जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी दिली.
जिल्ह्यात जिजाऊ बँक आघाडीवर :2022-23 या वर्षात बँकेची ठेवी 367 कोटी आहे. 268 कोटींचे कर्ज बँकेने वितरित केले आहे. भाग भांडवल 13.37 कोटी इतकी आहे. आरबीआयच्या नियमापेक्षा हे भाग भांडवल जास्त आहे. बँकेचा एनपीए केवळ 0.84 टक्के आहे. ही बाब बँकेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. बँकेला 7.9 कोटी नफा झाला आहे. त्यातून निव्वळ नफा हा 2.35 कोटी रुपये इतका आहे. सभासदांना दहा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. सहकारी बँकांमध्ये जिजाऊ बँक जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. एका व्यक्तीला चार कोटी आणि समूहाला सात कोटी कर्ज देण्याची क्षमता बँकेची आहे. बँकेची उलाढाल 1000 कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे, समाजात आर्थिक संपन्नता निर्माण करणे हा आमचा उद्देश असल्याचे देखील अविनाश कोठाळे म्हणाले.