अमरावती: डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंतीनित्त गावात निघालेली मिरवणूक जामा मशीदजवळ शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता पोहोचली होती. त्यावेळी डीजेच्या आवाजावरून दोन गटात काहीसा वाद झाला. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करून वाद सोडविला. यानंतर मिरवणूक सुरळीतपणे पुढे निघाली; परंतु मिरवणूक परत याच मार्गाने रात्री साडेनऊ ते दहाचे दरम्यान आली तेव्हा मिरवणुकीतील काही युवकांनी जोरजोर्याने घोषणाबाजी गेली. यामुळे या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला आणि मशिदीजवळ दोन समूहांमध्ये हाणामारी झाली.
अनेक जण जखमी:दोन्ही समुदायातील लोकं एकमेकांवर तुटून पडल्याने मशीदशेजारी असणाऱ्या मोठ्या सिमेंट नालीमध्ये पडून काही लोक जखमी झालेत. पोलीस कर्मचार्यांनाही वाद सोडवितेवेळी किरकोळ मार लागला. यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुरू केला. यामुळे दोन्ही समूहामधील लोक पळून गेलेत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यानंतर पोलिसांनी डीजेचा ट्रॅक्टर जप्त केला आणि मिरवणुकीचा ट्रॅक्टर पुढे रवाना केला.
35 जणांवर गुन्हे दाखल:या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही समाजातील लोकांची मध्यस्थी करून समजूत घातली. घटना प्रकरणी दोन्ही समाजामधील एकूण 35 लोकांवर आपसात वाद घालून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत. यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राजस यांनी घटनेची फिर्याद केली. रात्री साडेअकरा वाजता घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी भेट दिली आणि स्थिती जाणून घेतली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून गावात शांतता आहे. पोलीस प्रशासन घटनेला कारणीभूत असलेल्या लोकांचा शोध घेत आहे, अशी माहिती ठाणेदार पंकज दाभाडे यांनी दिली.