अमरावती -कोरोनामुळे अमरावती जिल्ह्यात अनेकांचे बळी जात असताना कोरोनाकाळात अमरावतीचे वादग्रस्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम हे भ्रष्टाचार करण्यात गुंतले आल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. यासंदर्भात पुरावे सुद्धा पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले आहे.
जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी उपस्थित केला प्रश्न -
डॉ. शामसुंदर निकम हे चार वर्षांपासून जिल्हा शल्यचिकित्सक, प्रशकीय अधिकारी, जिल्हा महिला रुग्णालय प्रमुख आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रमुख अशी चार पदे सांभाळत आहे. या सगळ्या जबाबदारीचा गैरफायदा घेत सगळ्या देयकांवर प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन्ही स्वाक्षऱ्या एकाच व्यक्तीच्या असतात याबाबत जिल्हा कोषागार अधिकारी कवलजीत सिंग यांनी आक्षेप घेतला असून या संदर्भात 3 फेब्रुवारी 2021 रोजी पत्र देऊन जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनाही कळविले होते.
बोगस बील लावून खरेदी -
शासन निर्णयानुसार 3 लाखापेक्षा अधिक किंमतीच्या खरेदीसाठी ई-निविदा काढणे बांधकारक आहे. 23 लाख 15 हजार, 801 रुपयांच्या औषधी खरेदी करण्यासाठी हाफकीन कंपनीकडून औषधे खरेदी करणे आवश्यक असताना राजेश फार्मा, एकर्ड सेल्स, सर्जीको हेल्थ, गुणवंत फार्मसिटीकल, सुवर्णा एजन्सी, एस.एम.एजन्सी यांच्या मार्फत दरात न लावता खरेदी करण्यात आले. या व्यवहारात क्रमांक 347 ते 310 पर्यंतचे बील खरे लावण्यात आले आहे. तर क्रमांक 209 ते 261 पर्यंत बोगस बील लावून औषध खरेदी करण्यात आली. या सर्व गंभीर प्रकाराबाबत जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे पत्रही मनसेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.