अमरावती - शहराच्या पूर्वेस घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेल्या भागात असणाऱ्या छत्री तलावाच्या पात्रात सौंदर्यीकरणाच्या नावावर चक्क काँक्रेटीकरण केले जात आहे. त्यामुळे तलावात काँक्रीटचे जंगल उभारण्यास निसर्गप्रेमी, नागरिकांनी विरोध दर्शवला असून जनआंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्री तलाव हे शहरातील अतिशय महत्वाचे पर्यटन स्थळ तसेच पोहरा, मालखेड जंगलातील बिबट, नीलगाय, हरीण, मोर अशा अनेक प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे महत्वाचे स्थान आहे. छत्री तलावाच्या थेट पात्रातच सौंदर्यीकरणाच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामासाठी आमदार रवी राणा यांनी शासनाकडून 15 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत.
तलावाच्या पात्रातच बांधकाम केले जात असल्याने हे सौंदर्यीकरण तलावात पाणी पिण्यासाठी येणाऱ्या जंगली श्वापदांसाठी धोकादायक असल्याचे निसर्गप्रेमी नागरिकांनी सांगितले. जंगलातील प्राण्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पुढाकार घेत भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी नागरिकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी तलाव वाचविण्यासाठी जनआंदोलन उभारण्यासाठी मार्गदर्शन केले.
अमरावतीच्या छत्री तलावात सुशोभीकरणाच्या नावे काँक्रिटचे जंगल
तलावाच्या पश्चिम दिशेला सौंदर्यीकरण करा, येथील उद्यान विकसित करा मात्र थेट तलावात इमारती उभारण्याचे काम थांबवा, अन्यथा जनआंदोलनाद्वारे आम्ही प्राणी आणि जंगलाचे संरक्षण करू, असा इशारा शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे.