अमरावती -राज्यात लसीच्या तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यात लसीकरण ठप्प झाले होते. अमरावतीमध्येही मागील आठ दिवसापासून अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी अमरावती जिल्ह्यासाठी 28 हजार डोस प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू झाली आहे. या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी पहाटे सहा वाजल्यापासूनच मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सकाळचे दहा वाजल्यानंतरही लसीकरण सुरू झाले नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आधीच कडाक्याची ऊन त्यात रांगेत उभे राहावे लागत असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
कोविशिल्ड घेतलेल्या ज्येष्ठांना दुसरा डोस पूर्वीच्याच केंद्रावर
जिल्ह्यात यापूर्वी कोविशिल्ड लस घेतलेल्या 45 वर्षांवरील व्यक्ती व ज्येष्ठांना दुसरी डोस मिळण्यासाठी 15 हजार 900 कोविशिल्ड लस प्राप्त झाली आहे. त्यामुळे या लसीचा दुसरा डोस पूर्वीच्याच शासकीय लसीकरण केंद्रावर उपलब्ध असेल. नोंदणीनुसार कोविशिल्डचा डोस घेतले असणाऱ्यांनी लसीकरण केंद्रावर यावे. हे लसीकरण टोकन पद्धतीने करणार असून सर्वांनी लसीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी केले आहे.
अमरावतीत लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड तरुणांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन प्राप्त एकूण प्राप्त झालेल्या लसीपैकी कोव्हॅक्सिनचे 12 हजार डोस प्राप्त झाले असून, ही लस केवळ पहिला डोस घेणाऱ्या तरुणांसाठीच आहे. केवळ वय 18 ते 44 वयोगटातील नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच ती देण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावती महापालिका, ग्रामीण भागात केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. या केंद्रावर दुसरा डोस घेणाऱ्यांनी गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा-घरची परिस्थिती हलाखीची, तरीही शिर्डीची पायल करते विनामुल्य रुग्णसेवा